सिल्लोड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अवघ्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. 

या दोन्ही घटनांमध्ये रोख रकमेसह लाखो रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. आव्हाना रोडवरील पंडित नगर भागात राहणारे मिस्तरी राजू शंकर मोरे यांच्या बंद घराचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला.

चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यातील १ लाख रुपये रोख आणि २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी चोरून नेले. या प्रकरणी सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक आर. एस. साळवी तपास करत आहेत. दुसरी घटना भराडी रस्त्यावरील आनंद पार्क जवळील हरिद्वार पार्क येथे घडली. 

येथे राहणाऱ्या गीता शामधन बैनाडे यांच्या घराचे चॅनल गेटचे लॉक तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून ९२ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि ५२ हजार रुपये रोख (५००, २०० व १०० च्या नोटा) असा ऐवज लंपास केला.